राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.लोकसभेप्रमाणे विधानसभेला ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे.लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जागावाटपावरही चर्चा सुरू केलीये दुसरीकडे मात्र काँग्रेसकडून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीने यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं असून शहर व तालुक्यातील सर्वच जिल्हाध्यक्षांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार देखील हे पत्र पाठवण्यात येत असल्याचंही पत्रात नमूद केलं आहे. विशेष म्हणजे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात आमदार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २० हजार रुपये पक्षनिधी द्यावा लागणार आहे.
राज्यातील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक ही सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान पार पडणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरुन या निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काँग्रेसकडून स्वबळाची चाचपणी करण्यात येत आहे राज्यातील २८८ मतदारसंघातून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने १० जुलैपर्यंत काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात इच्छुकांना आपले अर्ज जमा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अर्जासोबतच सर्वसाधारण उमेदवारांना पक्षनिधी म्हणून २० हजार रुपये जमा करावे लागणार आहेत.तर अनुसुचित जाती जमाती आणि महिला उमेदवारांना १० हजार रूपये भरावे लागतील महाविकास आघाडीच आगामी विधानसभा निवडणूका एकत्र लढायचं ठरलेले असतांनाही काँग्रेसचं प्लॅन बी वर काम सुरू असल्याचे या परिपत्रकातून दिसून येतय. त्यातच आता काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून घेण्यात येणारा पक्षनिधी हा चर्चेचा विषय बनला आहे
अर्ज नियमावली पुढील प्रमाणे :
काँग्रेस कमिटी प्रदेश कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १० ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावेत. विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्जासोबतच सर्वसाधारण वर्गासाठी २० हजार मात्र आणि अनुसूचित जाती आणि जमाती व महिला उमेदवारांसाठी १० हजार पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या नांवे डी. डी. द्वारे प्रदेश कार्यालयाकडे किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा करावेत जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जे उमेदवारी अर्ज जमा होतील ते उमेदवारी अर्ज पक्षनिधीसह प्रदेश कार्यालयाकडे मुदत संपण्यापूर्वी सादर करावेत.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार आपणांस कळविण्यात येते की आपण वरील माहिती वृत्तपत्र तसेच इतर प्रसार माध्यमांद्वारे आपल्या जिल्हयातील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहचवावी. असं जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.