विधानपरिषद निवडणुकीत आपल्याला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळाला. निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार उभा होते तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार उभा होते. महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी झाले पण महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीतील काँग्रेसची मतं फुटणार हे खुद्द काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनीच सांगितले होते.त्यामुळे उद्धव ठाकरे यांना क्रॉस वोटींगची जास्त भीती होती.निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून न आल्यास महाविकास आघाडीमधून बाहेर पडू असं वक्तव्य केल्याचं बोललं गेलं.
विधानपरिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडणार होती त्यामुळे सर्वच पक्षांना क्रॉस वोटींगचा धोका होता. क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून पक्षांनी आपआपल्या आमदारांना हॉटेल वर ठेवले होते. मात्र काँग्रेसच्या आमदारांना हॉटेलवर ठेवण्यात आलं नव्हतं. विधानपरिषद निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे उमेदवार जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई यांच्यात बैठक झाली. या बैठकीत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचे पुतणे हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये त्यांनी आपले काका व शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कट तयार करत असल्याचा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या निकाल आमचा उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडीमधून बाहेर पडून वेगळे होऊ असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकीच्या मतदानापूर्वी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल नाही.
मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेसची मतं मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. काँग्रेस पक्षाने मिलिंद नार्वेकरांना काँग्रेसचे कोणते कोणते आमदार मतदान करणार, त्या आमदारांची नावे असलेली यादी उद्धव ठाकरेंना दिली. त्यात मोहनराव हंबर्डे, सुलभा खोडके, कुणाल पाटील, शिरीष चौधरी या आमदारांच्या नावांचा समावेश होता. या आमदारांची मतं फुटतील आणि नार्वेकर पराभूत होतील, अशी भीती उद्धव ठाकरेंना होती. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. मिलिंद नार्वेकर यांचा विजय तर झाला पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि भाजपाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. चंद्रकांत पाटलांना बघताच संजय राऊत म्हणाले कि, आपण आता एकत्र यायलाच पाहिजे.राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्यात. महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे यांची नाराजी आणि याचदरम्यान संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना केलेल विधान राजकीय वर्तुळात काय बदल घडवणार हे पाहणं महत्वाचं असेल.