लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर फार मोठा पराभव स्वीकारावा लागला. पाच जागांपैकी फक्त एका जागेवरच त्यांना विजय मिळवावा लागला. पक्षफुटीनंतर देखील अजित पवारांपेक्षा शरद पवार वरचढ असल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. अनेकजण आपल्या राजकीय भविष्याचा विचार करून पक्षांतर देखील करत आहेत. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा गेल्या २५ ते ३० वर्षांपासून बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात अजित पवार यांना मोठा फटका बसल्याच दिसून येतंय. पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते, नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. पुण्यातील शरद पवार यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी ते प्रवेश करणार आहेत.
भोसरी आणि चिंचवड मध्ये भाजपाचे आमदार आहेत. विधानसभेसाठी आजून जागावाटप करण्यात आलेलं नसलं तरीदेखील निवडणुकीत पुन्हा त्याच नेत्यांची वर्णी लागेल अशी शक्यता आहे. यामुळेच आपल्या पुढील राजकीय भविष्याचा विचार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे, पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह काही कार्यकर्ते आणि १५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यांनतर विधानसभेला तिकीट मिळणार का..? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड जो अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो तिथे त्यांना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोठा फटका बसणार आहे.