देवाच्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपात ऐक्यता मानून सगुण परमात्म्याच्या नाम-रूपात्मक भक्तीचा अंगीकार वारकरी व संतांनी केला आहे. त्या भक्तीचा एक भव्य अविष्कार म्हणजे पंढरीची पायी वारी. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.असंख्य वारकऱ्यांची भक्ती साधना आहे.ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? पायी वारीचा इतिहास काय आहे.याविषयी आपल्याला क्वचितच माहिती असतं. हा हरिमय इतिहास, वारीची दिव्य परांपरा आज आपण अगदी सोप्या आणि साध्या शब्दात या व्हिडिओतून पाहणार आहोत.
इ.स १६८५ मध्ये संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र ‘नारायण बाबा’ यांनी पालखीची ओळख करून दिली कारण त्यांना वारी परंपरेत बदल घडवायचा होता. नारायण महाराजांनी नाविन्यपूर्ण पालखीची ओळख करून दिंडी – वारीच्या परंपरेत बदल घडवून आणायचं ठरवलं. संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले, तिथं त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इ. स १८३० पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांमध्ये आपापसांत संघर्ष झाला.मानपानाच्या मुद्द्यावरून वाद झाले.या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगळ्या पालखींचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला. ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते.आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या-सत्पुरुषांच्या पालख्या पंढरपुरात येतात. वारीत पुरुष, महिला असा कधी भेद नाही. वारीमुळं द्वेष, अहंकार गळून पडतो.वारीचा हा सुंदर सोहळा महाराष्ट्राशिवाय जगात कुठेही नाही.म्हणून पंढरीची वारी करून वारकरी, सर्व विठ्ठल भक्त स्वतःला धन्य मानतात.