संपूर्ण देशाचं ज्याकडे लक्ष लागलेलं, तो केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. यंदाचं निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आता लोकसभा निवडणुक निकालानंतर NDA सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सादर केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री सीतारामण यांचा सलग सातवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांपासून ते बड्या उद्योजकांसह अनेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत ? काय स्वस्त आणि काय महाग होणार आहे ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. बिहारमधील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. बिहारमध्ये 21 हजार कोटी रुपयांच्या पॉवर प्लांटचीही घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय बिहारला आर्थिक मदत मिळणार आहे. आंध्र प्रदेशला सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.आता या बजेटमध्ये स्वस्त काय होणार तर सोनं आणि चांदी स्वस्त होणार आहे.यासह मोबाईल हँडसेट आणि मोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार आहेत. मोबाईलचे सुटे भाग देखील स्वस्त होणार आहेत. कॅन्सरवरील तीन औषधे कस्टम ड्युटीमधून वगळली आहेत. पोलाद व तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत दिली जाईल.तर प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणार आहे आणि प्लास्टीक उत्पादने महाग होणार आहेत.