लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा दारुण पराभव केला. लोकसभेला जसा फटका बसला तसा फटका विधानसभेला बसू नये यासाठी महायुती सर्वोतोपरी प्रयत्न करतीये. लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरवात केली. भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील त्यांच्या मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून भाजपावर सडकून टीका केलीये. यानंतर महायुतीमधील घटक पक्षात हालचाली सुरु झाल्या आहेत. महायुतीमधील घटक पक्ष राज्यात सभा घेत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलैला वाढदिवस होता त्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर,अहमदनगर,श्रीगोंदा, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी दौरा केला होता.
विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या अर्थसंकल्पात महिला वर्गाला खुश करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लागू केली. या दौऱ्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर लावण्यात आले होते. चारही मतदारसंघांत आयोजित कार्यक्रमांमध्ये अजित पवारांनी महिलांना संबोधित केलं. त्यात त्यांनी योजनेचा उल्लेख माझी लाडकी बहीण योजना असा केला.परंतु ही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं सुरु करण्यात आली असून या योजनेचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं आहे. पण अजित पवारांनी भाषणादरम्यान मुख्यमंत्री शब्दाचा उल्लेख टाळला.अजित पवारांनी यावेळी महिलांशी संवाद साधत लाडकी बहीण योजनेची माहिती दिली. या योजनेतून महिलांना होणारे फायदे देखील त्यांनी यावेळी सांगितले. पण त्यांनी योजना सांगताना मुख्यमंत्री शब्द वारंवार टाळला. अजित पवारांच्या दौऱ्यासाठी गुलाबी रंगाचे पोस्टर लावण्यात आले होते पण त्यावर फक्त अजित पवारांचाच फोटो होता. मुख्यमंत्र्यांच्या नावाचा व फोटोचा या पोस्टरमध्ये कुठेच उल्लेख नव्हता. यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा झाली. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्पष्टीकरण देण्यात आलं, यावरुन कोणताही वाद निर्माण करण्याची गरज नाही. योजनेचं नाव माझी लाडकी बहीण असं आहे. त्यामुळे तोच उल्लेख बॅनरवर आहे. त्यात कोणतंच राजकारण नाही. कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही.