महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात काही भागांत अतिमुसळधार पाऊस झाला. अनेक भागांत पुर सदृश्य परिस्थिती उद्भवली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला होता. पुण्यात पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली होती. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. अनेक सखल भागांत, नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. खडकवासला धरण ९५ टक्के भरल्याने मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
पण, आता पावसाचा जोर कमी झाला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विर्दभात अमरावती जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहरात पावसाचा जोर ओसरला आहे. तर उपनगरामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी होत आहे. पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी मुसळधार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. 30 जुलै रोजी महाराष्ट्रातील काही ठिकाणी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भातील सर्व जिल्ह्यांत गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.