विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे. मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे..तसंच मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या यावरही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत..जागावाटपाचा विषय लवकर मार्गी लावण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. आता नेमका नवा फॉर्म्युला कसा तयार करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस कोण किती जागा लढणार? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेत त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभेच्या जागावाटपावेळी तिन्ही पक्षांना वाटाघाटी करावी लागली. अनेक जागांचा तिढा सोडवण्यात बराच वेळ गेला. हे वाद टाळण्यासाठी आतापासूनच अनेक बैठका आणि प्राथमिक चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहेत. महाविकास आघाडीला लवकरात लवकर जागावाटप आटोपायचं आहे. काँग्रेस आणि ठाकरेसेनेला प्रत्येकी १००, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ८० जागा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा लहान पक्षांना सोडल्या जाऊ शकतात. जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेतून ही आकडेवारी समोर आली आहे. लोकसभेत काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. १७ जागा लढवणाऱ्या काँग्रेसला १३ जागांवर यश मिळालं. गेल्या लोकसभेला काँग्रेसला राज्यात केवळ एक जागा मिळाली होती. पण यंदा १३ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसनं विधानसभेला १०० पेक्षा अधिक जागा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेस १०० जागांवर लढेल. तर लोकसभेला सर्वाधिक २१ जागा लढवणाऱ्या ठाकरेसेनेला केवळ ९ जागांवर यश मिळालं. लोकसभेला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा ठाकरेसेनेनं लढवल्या. पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. पण विधानसभेला ठाकरेसेना ९० ते १०० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाला ८० जागा मिळू शकतात. तर उर्वरित छोट्या पक्षांना ८ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीचं जागावाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मविआचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. ‘मित्रपक्षांमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होतील. त्यातून जागावाटपाबद्दल एकमत होईल. प्राथमिक चर्चेनुसार, काँग्रेस, ठाकरेसेनेला प्रत्येकी १००, तर शरद पवार गटाला ८० जागा सुटू शकतात. बाकीच्या जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील. जागावाटपात फार मोठे बदल होणार नाहीत,’ अशी माहिती या नेत्यानं दिली.