आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या जोरदार चर्चेत आहे. या योजनेचा पहिला हफ्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा देखील होणार आहे. दरम्यान या योजनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊत म्हणाले, 1500 रुपयांत मुख्यमंत्री व त्यांच्या टोळय़ांनी घरची चूल पेटवून दाखवावी. पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय? असं संजय राऊत म्हणाले.
राऊत पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील भगिनींनी सध्या हे 1500 रुपये जरूर घ्यावेत, मात्र राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच या 1500 मध्ये भरघोस वाढ होईल याची खात्री बाळगा. रवी राणा यांच्यासारखे सरकारी लोचट मजनू लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे काढून घेण्याची भाषा करतात हा समस्त लाडक्या बहिणींचा अपमान आहे. हा पैसा यांच्या बापजाद्यांचा आहे काय किंवा सरकारी लुटीतला आहे काय? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. असं संजय राऊत म्हणाले. ‘शिंदेंचं राज्य हे पैशांचं राज्य आहे. पैशांतून आलेलं राज्य हे बदफैलींचं राज्य असतं. तसं नसतं तर लाडक्या बहिणींचा असा अपमान झाला नसता. एकीकडे बहीण म्हणून दरमहा 1500 रुपये देण्याच्या बतावण्या सरकार करीत आहे आणि दुसरीकडे आम्हाला मत दिले नाही तर हे पैसे तुमच्या खात्यातून काढून घेऊ, ‘लाडकी बहीण’ योजनेतून नाव वगळू अशा जाहीर धमक्या सत्तापक्षातील लोचट मजनू देत आहेत. मिंधे सरकारची खरी ‘नियत’च त्यामुळे चव्हाटय़ावर आली आहे. राज्यातील समस्त भगिनी या अपमानाचा योग्य बदला योग्य वेळी घेतील, याविषयी आमच्या तरी मनात शंका नाही, असंही संजय राऊत म्हणाले.