राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागलेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी देखील काही मागे नाही. लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला काहीशी चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नवीन चिन्ह दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जरी करण्यात असून या पत्रामध्ये विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला “गॅस सिलेंडर” चिन्ह घोषित केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रेदरम्यान २५ जुलै ते ७ ऑगस्ट वेळी संपूर्ण राज्यात दौरा केला. यामुळे वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीसाठी ही जमेची बाब मानली जात आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सर्वच मतदारसंघात ‘गॅस सिलेंडर’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तर विधानसभा निवडणुकीवेळी काही ठिकाणी कपबशी, तर काही ठिकाणी गॅस सिलेंडर अशा वेगवेगळ्या चिन्हावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक लढवली होती.