सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फुटांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना सोमवारी २६ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेचा सध्या राज्यभरातुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरात आंदोलन करत घडलेल्या दुर्घटनेचा निषध केला जात आहे. गेल्या वर्षी नौदल दिनाच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. परंतु आठ महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. या घडलेल्या दुर्घटनेनंतर भाजपची आज महत्त्वाची कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रकांत दादा पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच महाराष्ट्राचे भाजपचे संकटमोचक अशी ओळख असणारे गिरीश महाजन उपस्थित असणार आहेत. मागील काही घडलेल्या घटनांसंदर्भात या बैठकीत चर्चा करून त्यावर काय उपाययोजना करता येतील का? हा होणाऱ्या बैठकीचा मुख्य उद्देश असेल असं बोललं जात आहे.
तसंच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर महायुतीतील सगळ्याच घटक पक्षांनी माफी मागितली आहे. या घटनेनंतर सरकार विरोधात जनसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षांकडून देखील तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोअर कमिटीच्या बैठकीत सर्व नेते मंथन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील वाढत चाललेलं पक्षांतर यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे समरजीत घाटगे यांनी तुतारी हाती घेतली आहे. तसेच माजी मंत्री आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. पक्षातील नेत्यांच्या पक्षांतरावर या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये मंथन करण्यात येणार असल्याचं समजतंय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला या गोष्टींचा फटका बसू नये व या गोष्टींवर काय तोडगा काढता येऊ शकतो का? या संदर्भात चर्चा होण्याच्या शक्यता आहेत.