लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार झटका दिला. यामध्ये महत्वाचा रोल राहिला तो शरद पवारांचा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केवळ १० जागा लढवल्या आणि त्यापैकी ८ जागांवर विजय मिळवला. त्यांचा स्ट्राईक रेट हा सर्वात जास्त राहिला. शरद पवार डाव कसा फिरवू शकतात याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आल्याने आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजपचे नेते व देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समरजित घाटगेंनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील, मदन भोसले, विवेक कोल्हे, बाळा भेगडे, जगदीश मुळीक, प्रशांत परिचारक, राजन पाटील, दिलीप सोपल, रणजीत शिंदे, रमेश कदम हे महायुतीतील बडे नेते तुतारी हाती घेणार असल्याची जोरदार चर्चा असताना आता यात आणखी एका नावाची भर पडली आहे. शरद पवारांनी आपला मोर्चा आता जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदार संघाकडे वळवला आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांविरोधात भाजपातीलच मातब्बर नेता निवडणुकीच्या रिंगणात शरद पवार उतरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पण हा नेता नेमका कोण आहे? गिरीश महाजनांविरोधात शरद पवार नेमका कोणता डाव टाकण्याच्या तयारीत आहेत? यंदाची निवडणूक महाजन यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते का? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
शरद पवार हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पिंजून काढत भाजप तसेच महायुतीविरोधात डावपेच आखताना दिसून येत आहेत. शरद पवार यांनी भाजपचे नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार शोधला असल्याचं बोललं जातंय..भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच मराठा समाजातील मातब्बर व्यक्तिमत्व मानल्या जाणाऱ्या दिलीप खोडपे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करुन दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्याविरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे राहण्याची तयारी करत असल्याचं दिलीप खोडपे यांनी सांगितलं आहे. गेल्या 35 वर्षापासून मी भाजपचं काम करत आहे. पण गेल्या दहा वर्षापासून भाजपमध्ये आपली घुसमट होत असल्याने आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचंही खोडपे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या विरोधात आपल्याच पक्षातील नेत्याचं आव्हान उभं राहिलं आहे. खरं तर गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर मतदारसंघात त्यांना कुणाचंही आव्हान नसल्याचं चित्र होतं. कारण काही महिन्यांपूर्वी महाजन यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या संजय गरूड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं महाजन यांचा एकतर्फी विजय होईल असं सर्वांचं मत होतं. अशा स्थितीत आता गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले दिलीप खोडपे यांनी भाजपचा राजीनामा दिला असून ते लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सुरु असलेली शिवस्वराज्य यात्रा येत्या 21 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे. याच शिवस्वराज्य यात्रेदरम्यान खोडपे हे तुतारी हाती घेऊ शकतात. स्वतः शरद पवार या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.