विधानसभा निवडणुकीत राज्यातील ज्या महत्त्वाच्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल अशा मतदारसंघांमध्ये परळी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. परळी हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला आहे. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मुंडे बहीण भावात थेट लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंचा मागच्या २०१९ च्या निवडणुकीत पराभव केला होता तर, त्यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत पंकजा यांनी धनंजय यांचा पराभव केला होता. पण गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. परळीतील राजकीय समीकरणं बदलली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी देऊन परळीतून धनंजय मुंडे यांचा मार्ग सोपा झाला. पण धनंजय मुंडेंनी शरद पवारांची साथ सोडल्यानं यंदा परळी जिंकणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये मराठा आरक्षणाचा परिणाम दिसून आला. पंकजा मुंडेंचा पराभव झाला. आता पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडेंचा नंबर.. अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. या चर्चांना कारण ठरलं आहे ते परळीत शरद पवारांनी टाकलेला नवा डाव. परळीत धनंजय मुंडेंविरोधात शरद पवार नेमकी कोणती चाल खेळण्याच्या तयारीत आहेत ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
शरद पवार परळीत मराठा कार्ड खेळण्याची शक्यता अधिक वाढली आहे. शरद पवारांनी धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. शरद पवार ज्या व्यक्तीच्या जीवावर राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही गोपीनाथ मुंडेंचा हा बालेकिल्ला पुन्हा जिंकू इच्छितात त्या व्यक्तीचं नाव आहे, राजेसाहेब देशमुख. महाराष्ट्रातील या अत्यंत महत्त्वाच्या मतदरासंघात राजेसाहेब देशमुख यांच्या रुपात अगदीच नवा उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष आहे. राजेसाहेब देशमुख यांनी नुकतीच ‘सिल्वर ओक’वर शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार परळीमध्ये मराठा कार्ड वापरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पवारांची ही खेळी धनंजय मुंडेंना आव्हान देणारी ठरू शकते. सध्या धनंजय मुंडे हे परळीचे विद्यमान आमदार असून महायुती सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत. त्यामुळे महायुतीत अजित पवार गटाला ही जागा सुटेल आणि या ठिकाणाहून पुन्हा धनंजय मुंडे हेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित मानलं जातंय. हीच बाब लक्षात घेऊन शरद पवारांनी या मतदारसंघासाठी विशेष नियोजन सुरु केलं आहे. धनंजय मुंडेंचं तिकीट इथून जवळपास निश्चित मानलं जात असतानाच मुंडेंना बालेकिल्ल्यात कोण आव्हान देणार. असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात होता. आता परळी विधनसभा मतदारसंघाची परिस्थिती मागील काही दिवसांमध्ये अधिक स्पष्ट झाली आहे. काही दिवसांपूर्वीच राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन परळीतून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्ती केली होती. मात्र परळी मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार हे अगदी निश्चित मानलं जातंय. त्यामुळे काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख तुतारी हातात घेणार की शरद पवार एक पाऊल मागे जात ही जागा काँग्रेसला सोडणार हे काही दिवसात स्पष्ट होईल .पण महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार हे राजेसाहेब देशमुख असतील असं चित्र सध्या तरी दिसून येतंय.