विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील सर्वात लक्षवेधी लढत ही बीड जिल्ह्यातील परळीमध्ये होण्याची शक्यता आहे. भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा गड असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भारतीय जनता पार्टीबरोबर महायुतीत असल्याने आणि परळीत त्यांच्याच पक्षाचा आमदार असल्याने हा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता अधिक आहे. परळीत मंत्री धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंना महाविकास आघाडीतून कोण टक्कर देणार याचीच चर्चा सध्या राज्यभर सुरु आहे. धनंजय मुंडेंनी शरद पवारांची साथ सोडल्याने इथं शरद पवार त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. सध्या महाविकास आघाडीतून राजेश फड, राजेसाहेब देशमुख आणि सुदामती गुट्टे ही तीन नावं सर्वाधिक चर्चेत आहेत. या तिघांपैकी कोणाचं पारडं जड ठरेल? शरद पवार मुंडेंना टक्कर देण्यासाठी कोणत्या उमेदवाराची निवड करणार? पवारांच्या मनात नेमकं कोण आहे? याचविषयी आणि परळीत सुरु असलेल्या राजकीय घडामोडींविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
एक महिन्याआधीच राजाभाऊ फड यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राजाभाऊ फड हे राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष असून गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. ते भाजप नेत्या पंकजा मुडे यांचे निकटवर्तीय होते. त्यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क असल्याचं बोललं जातं. सध्या ते विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळं राजाभाऊ फड विधानसभेच्या रिंगणात उभे राहिल्यास धनंजय मुंडेंना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे देखील परळीतून इच्छूक आहेत. गेले तीन टर्म ते बीडचे जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. अंबाजोगाई आणि परळी मतदारसंघातील काही भागात त्यांची ताकद असल्याचं बोललं जातं. या भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. राजेसाहेब देशमुख सामाजिक उपक्रम आणि जनमाणसात सहभागी होत असल्याने परळीकरांसाठी परिचयाचा चेहरा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट देखील होती.धनंजय मुंडेंविरोधात लढण्यासाठी सुदामती गुट्टे यांचं ही नाव चर्चेत आहे. गुट्टे या शरद पवार गटाच्या प्रबळ दावेदार असल्याची चर्चा आहे. गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या त्या पत्नी आहेत.सुदामती गुट्टे गंगाखेड साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. २००७ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे… परळीत राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यात सुदामती गुट्टे यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. २००९ मध्ये पंकजा मुडेंविरोधात लढण्यासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. पण ही जागा तेव्हा काँग्रेसला सुटल्याने पक्षाचा आदेश मानत त्यांनी माघार घेतली होती. तर काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांच्या विजयात त्यांचा देखील मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. त्यामुळे शरद पवार या तीन नावांपैकी कोणाला मुंडे यांच्या विरोधात उतरवणार हे पाहावं लागेल. इथं मनोज जरांगे फॅक्टर देखील महत्वाचा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर सगळ्या जागा पाडणार असा इशारा त्यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्द्यामुळे पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता जर विधानसभा निवडणुकीतही ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष झाला तर त्याचा मोठा फटका धनंजय मुंडे यांना बसू शकतो. त्यामुळे शरद पवार परळीत मराठा कार्ड वापरणार की कोणत्या अनुभवी उमेदवाराला मैदानात उतरवणार हे लवकरच स्पष्ट होईल.