पुणे : समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जय आनंद ग्रुपतर्फे पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षी दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ तर, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे मुख्य सचिव आदेश खिंवसरा यांना ‘मानव सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. रविवारी पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
जय आनंद ग्रुपतर्फे आयोजित या पुरस्कार सोहळ्यास जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल, ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाचे सदस्य गिरीश शहा, प्रसिद्ध उद्योजक राजेश सांकला, जीतो पुणेचे अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, जय आनंद ग्रुप पुणेचे अध्यक्ष पृथ्वीराज धोका, जय आनंद ग्रुप पुणेचे सचिव आनंद कोठारी, कार्याध्यक्ष गणेश कोठारी, माजी अध्यक्ष अनिल लुंकड, माजी अध्यक्ष अशोक लोढा, जीतो युथ विंगचे अध्यक्ष गौरव बाठिया आणि जय आनंद ग्रुपचे सर्व कार्यकारणी सदस्य तसेच सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजेंद्र बाठिया गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साधर्मिक कुटुंबियांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत. त्यांच्या कार्याची व्याप्ती शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे समाजातील अनेक लोकांचे जीवनमान उंचावले गेले आहे. तसेच, आदेश खिंवसरा यांनी आपले आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले असून साधर्मिक, निराधार आणि वंचित घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे. आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि गरजूंना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
जय आनंद ग्रूपचे अध्यक्ष पृथ्वीराज धोका यांनी या पुरस्कारामागची भावना यावेळी सांगितली. ते म्हणाले, “राजेंद्र बाठिया आणि आदेश खिंवसरा यांनी नेहमीच समाजात आपल्या कामातून वेगळी छाप पाडली. आणि त्यातून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. त्यामुळे समाजाच्या भल्यासाठी कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा आम्ही सुरू ठेवणार आहोत.”.
जीतो अपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी म्हणाले की, “जय आनंद संस्था गेली 25 वर्षापासून कार्यरत आहे आणि समाजातील अशा आदर्श व्यक्तींना शोधून पुरस्कार देते. त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. राजेंद्र बाठिया हे असे व्यक्ती आहेत जे प्रत्येकवेळी आपल्या सामाजिक कामातून सर्वांना आश्चर्यचकित करतात. व्यापार आणि सामाजिक क्षेत्रांत त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तसेच आदेश खिंवसरा हे मदतीसाठी तत्पर असं व्यक्तिमत्व आहे. देशात कोविड काळामध्ये कोणीही बाहेर येत नव्हतं तेव्हा बनिया ही संस्था पुढं आली आणि त्याची सुरुवात आदेश यांनी केली. अशा योग्य व्यक्तीचा ‘मानव सेवा’ पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल मी जय आनंद ग्रुपचे मनापासून आभार व्यक्त करतो.”
आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, “समाजभूषण हा पुरस्कार राजेंद्र बाठिया आणि मानव सेवेचा पुरस्कार आदेश खिंवसरा यांना मिळाल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. तसेच हा पुरस्कार देण्यासाठी आलेले सर्व प्रमुख पाहुणे हे समाजातील स्वतः एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यांना एकत्र आणण्याचे काम जय आनंद ग्रुप ने केल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो”.
कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यावेळी बोलताना म्हणाले, “या पुरस्कार सोहळ्यासाठी मी जय आनंद ग्रुप ला शुभेच्छा देतो. राजेंद्र बाठिया यांनी व्यवसायासोबतच अनेक सामाजिक कामे कामे केली. तसेच आपल्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यावर्षी त्यांना हा समाजभूषण पुरस्कार भेटला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे मुख्य सचिव आदेश खिंवसरा यांना मानव सेवा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचेही खूप खूप अभिनंदन”.
पुरस्काराला उत्तर देताना राजेंद्र बाठिया म्हणाले की, ”हा पुरस्कार म्हणजे आजवर केलेल्या कामाचा आशीर्वाद आहे. कोणताही पुरस्कार हा व्यक्तीला नसून, तो त्याचा कामासाठी असतो. या व्यासपीठावर उपस्थित प्रत्येक मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. आणि असे सर्व मान्यवर आज मला आशीर्वाद देण्यासाठी इथे आले त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून समाजसेवेची जबाबदारी आहे. मी ही जबाबदारी अधिक जोमाने पार पाडण्यासाठी वचनबद्ध राहील.”
आदेश खिंवसरा यांनीही पुरस्काराला उत्तर देताना सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मानवतेच्या सेवेसाठी मला अधिक चांगले कार्य करण्याची उर्जा यामुळे मिळाली आहे. यासाठी सर्वांचे आभार मानतो.”
ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाचे सदस्य गिरीश शहा म्हणाले, “समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र बाठिया आणि मानव सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदेश खिंवसरा यांचे मनापासून अभिनंदन करतो. जय आनंद संस्था सलग 25 वर्षे समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करीत असल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो.”