पुणे | कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्राला दुध-साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. त्यात चंद्राची किरणे पडली की ते दूध नैवेद्य म्हणून सर्वांमध्ये वाटले जाते. हे दूध प्रामुख्याने चांदीच्या वाटीमधून दिले जाते. यामागे कोणती कारणे आहेत ते आज जाणून घेऊया.
ज्योतिष शास्त्रानुसार, संपूर्ण वर्षात फक्त कोजागिरीला चंद्र सोळा कलांनी उगवलेला असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यावेळेस त्याच्यातून निघणारी किरणे अमृतासमान व औषधी मानली जातात. ती किरणे दुधात पडल्यामुळे दुधाची पौष्टिकता वाढते. चंद्राची शुभ्र व शीतल किरणे शोषून घेण्याची क्षमता शुभ्र दुधात असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध किंवा खीर ठेवली जाते आणि त्याचा आस्वाद घेतला जातो.
सूर्यकिरणांप्रमाणे चंद्रकिरणे शरीरास अतिशय उपयुक्त असतात. या दुधामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते व शरीराला समृद्धी व सुदृढता लाभते. काही जण दुधाऐवजी पौष्टिक तांदळाची खीरसुद्धा पीतात. चांदीच्या वाटीतून दूध पिले जाते, कारण चांदी हा धातू शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच चंद्र किरणे शोषून घेण्याची क्षमता त्यात अधिक असते.
असे मानले जाते की, हे दूध किंवा खीर सेवन केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतात. म्हणून चंद्रकिरण मिश्रित दुधाचे शरद पौर्णिमेच्या रात्री सेवन केले जाते. चंद्रप्रकाश विशेषतः तापट व्यक्तींसाठी गुणयुक्त ठरतो. चंद्र प्रकाशात सफर केली असता आल्हाददायी वाटते आणि मन शांत होते. रात्रीच्या शांत वेळी गरम दूध मनाला व देहाला प्रसन्नता देते.
चंद्र, चांदणे, दूध, साखर सर्वच पांढरे आहेत म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवलरंगी उत्सव म्हणून साजरा केला जातो. रात्रीच्या सोबतीने चंद्राच्या छायेत दूधाची गोडी उत्सवाचा आनंद द्विगुणित करते.
फॉर द पीपल न्युज तर्फे सर्वं प्रेक्षकांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!