नवी दिल्ली | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) निवडणूक चिन्ह धनुष्य बाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) वाद आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचला आहे. दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यात ठाकरे गटाकडून आज महत्वाचा दावा निवडणूक आयोगासमोर केला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत असा सवाल ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या याचिकेत युक्तिवाद सुरु आहे. शिवाय शिंदेंनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असं ठाकरे गटानं म्हटलं आहे.
राजधानी दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्र तयार आहेत. अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत. फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू, असा दावा उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला अद्यापही आव्हान दिले गेलेले नाही. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही बाब आपल्या याचिकेत मान्य केली आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या याचिकेत युक्तिवाद केला आहे. त्यामुळे चिन्हाबाबतचा कुठलाही दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही. मुख्य नेता या पदावर शिंदेंनी स्वतःला नेमलं आहे पण अशा पद्धतीचे कुठलेही पद शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही, असा दावा देखील ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारच उतरवणार नाहीत तर मग चिन्ह का मागत आहेत? याउलट ज्या जागेवर निवडणूक होत आहे तिथे आधी आमचाच उमेदवार आहे. त्यामुळे चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत जैसे थे स्थिती ठेवावी. शिंदे गट या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याने चिन्हाबाबत निर्णय घेण्याची कुठलीही तातडीची परिस्थिती नाही, असा दावा देखील ठाकरे गटानं आयोगासमोर केला आहे.