महाराष्ट्रासाठी दिलासा देणारी एक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येत आज घट झाली आहे. आज राज्यात 449 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कालच्या पेक्षा ही संख्या कमी आहे. काल राज्यात 459 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. याबरोबरच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे आज नव्या रूग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. आज राज्यात 538 रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आज पाच कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 538 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,69,878 करोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98. 13 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 82 टक्के एवढा झाला आहे. कोरोना रूग्णांमध्ये घट होत असली तरी मृत्यूमध्ये अद्याप घट झालेली नाही. कारण सप्टेंबर महिन्यात दर दिवसाला एक किंवा दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ही संख्या जास्त आहे. काल देखील राज्यात पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता.
राज्यात सध्या 3192 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. यात पुण्यात 1179 सक्रिय रूग्ण आहे. तर मुंबईत 697, ठाण्यात 340, नागपूरमध्ये 110, नाशिकमध्ये 102, रायगड 98 तर पालघरमध्ये सध्या 55 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही.
राज्यासह देशातील कोरोना रूग्णांमध्ये देखील घट होत आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत देशात 3805 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 5069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची 38 हजारांवर 293 इतकी झाली आहे. देशातील सक्रिय रूग्णांची संख्या देखील राज्याप्रमाणेच घटत आहे.