कुल्लू | हिमाचल प्रदेश राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर होणे बाकी असताना भाजपने आता हे राज्य जिंकण्यासाठी रणनीति आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिला हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jai Ram Thakur) यांनी दिली आहे.
कुल्लू दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जयराम ठाकूर बोलत होते. यामध्ये त्यांनी सांगितले की, ‘विधानसभा निवडणुकीदरम्यान कंगना राणावत भाजपच्या प्रचारार्थ उतरणार आहे. कंगना रॅलीसाठी स्टार प्रचारक असणार आहे. त्यावर माध्यमांनी कंगनाला याबाबत विचारले असता ती म्हणाली, ‘मी माननीय मुख्यमंत्री जयरामजी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. हिमाचलप्रती असणारे व्यक्त होते. माताजीने मुख्यमंत्री महोदयांसाठी नाश्ताही बनवला होता. त्याचा आस्वाद मुख्यमंत्र्यांनी घेतला. मंत्री गोविंदसिंहजी माझे शेजारी आहेत. पण इतक्या वर्षांनी आज त्यांना भेटण्याची संधी मिळाली’.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कंगनाने टीका केली होती. तसेच त्यावेळी मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्यानंतर कंगनानेही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आता कंगना राणावतला भाजपने स्टार प्रचारक केल्याने राजकीय स्तरावर एकच चर्चा आहे.