प्रहार संघटनेचे नेते आणि दिव्यांगांचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बच्चू कडू यांचा अचलपूरमध्ये झालेला पराभव हा त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे. बच्चू कडू हे अचलपूरमधून सलग चार वेळा निवडून आले. परंतु यंदा मात्र त्यांचा धक्कादायक पराभव झाला. महाराष्ट्रात दिव्यांग लोकांसाठी सहसा कुणी आवाज उठवला नाही. परंतु, बच्चु कडू त्यांचा आवाज बनले. शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांवर आक्रमक होणारा आमदार म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. २०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हा बच्चू कडूंना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. मंत्रिपद मिळाल्यानंतर बच्चू कडू हे नाव एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचले. पण म्हणतात ना सत्ता आल्यावर भले भले बदलतात. तसं बच्चू कडू बदलतात की सत्तेतल्या लोकांना बदलवतात असा प्रश्न तेव्हा उपस्थित केला गेला होता. पण गेल्या पाच वर्षात बरीच राजकीय उलथापालथ झाली. त्यात बच्चू कडू यांच्या भूमिका देखील बदलताना पाहायला मिळाल्या. कडू शिंदेंच्या बंडात सामील झाले. त्यामुळे गद्दार, खोकेवाले असा शिक्का त्यांच्यावर लागला. त्याविषयी त्यांनी जाहीर भूमिका देखील मांडली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते महायुतीतून बाहेर पडले. आणि एकला चलो रे ची भूमिका घेत राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या परिवर्तन महाशक्तीला साथ दिली. या तिसऱ्या आघाडीतून त्यांनी आपल्या प्रहार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यांना भाजपच्या प्रवीण तायडे आणि काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांचं आव्हान होतं. या तिरंगी लढतीत भाजपच्या प्रवीण तायडेंचा विजय झाला. बच्चू कडू हे दुसऱ्या स्थानी राहिले. त्यामुळे एकच चर्चा सुरु झाली ती म्हणजे ज्या बच्चू कडूंनी अचलपूरमधून सलग चार वेळा विजय मिळवला. त्यांना यावेळी आपला गड का राखता आला नाही. बच्चू कडू यांचं नेमकं काय चुकलं ? त्यांच्या पराभवाची कारणं काय? याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रात परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राज्यातील विविध मतदारसंघात आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते . मात्र या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देणाऱ्या बच्चू कडू यांचाच दारुण पराभव झाला. भाजपच्या प्रवीण तायडे यांना 78, 201 मतं मिळाली. 12,131 मतांच्या फरकाने त्यांनी बच्चू कडूंचा पराभव केला. बच्चू कडूंना 66, 070 मतं मिळाली. तिसऱ्या स्थानी काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख राहिले. त्यांना 62, 791 मतं मिळाली. बच्चू कडूंनी परिवर्तन महाशक्तीसाठी राज्यभरात विक्रमी सभा घेतल्या. मात्र स्वतः बच्चू कडूंना आपल्या होमग्राउंडवर हार पत्करावी लागली. ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बच्चू कडूंसाठी हा मोठा धक्का होता. विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत बच्चू कडूंना हा प्रहार सहन कारवा लागला. तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडूंनी आपल्या पक्षाचे ३८ जागांवर उमेदवार उभे केले होते. पण त्यांच्या पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.