नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. ज्येष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि माजी केंद्रीयमंत्री शशी थरूर (Shashi Tharoor) या दोन्ही नेत्यांमध्ये प्रमुख लढत होत आहे. थरूर यांनी माध्यमांशी बोलताना ‘ज्यांना वाटतं काँग्रेसमध्ये सर्व ठीक, त्यांनी मला मत देऊ नये’, असे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याची आता एकच चर्चा सुरु आहे.
काँग्रेस अध्यक्षपदावरून थरूर यांचे हे मोठं वक्तव्य मानले जाते. त्यांनी म्हटले की, ज्या लोकांना बदल हवा आहे, त्यांनी मला विजयी करावे. तसेच ज्यांना वाटते पक्षात सर्वकाही ठीक आहे. अशा लोकांनी मला मत देऊ नये. जे मतदार 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत दूर होते अशांनी आता पुढे यावे. मी काँग्रेस पक्षात बदल घडवू इच्छितो. मोठमोठे नेते तिकडे (खर्गे यांच्याकडे) गेले आहेत. मात्र, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आश्चर्यकारक होऊ शकते.
दरम्यान, शशी थरूर यांनी राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबतही मत व्यक्त केले. पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडण्याचा निर्णय मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतरच घेतला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.