मुंबई | मुंबई विद्यापीठाकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना अवघ्या १४ महिन्यांतच पीएचडी बहाल करण्यात आली आहे. एरव्ही इतर विद्यार्थ्यांना पीएचडीची पदवी मिळवण्यासाठी वाट पाहावी लागत असताना सोमय्या यांच्या मुलाला पीएचडीची पदवी लगेच मिळाल्याने मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोमय्या यांच्या मुलाच्या पदवीसाठी विद्यापीठाकडून इतकी तत्परता का? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
नील सोमय्या (Neil Somaiya) यांना पीएचडीची पदवी प्रदान करताना सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले आहे. मात्र, या सगळ्यात मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) दाखवलेली तत्परता आणि वेग अनेकांचा चर्चेचा विषय बनला आहे. नील सोमय्या यांनी यावर्षी १७ ऑगस्टला पीएचडीसाठी प्रबंध सादर केला होता. त्यानंतर त्यांना अवघ्या दीड महिन्यातच तोंडी परीक्षेसाठी बोलवण्यात आले. ही तोंडी परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना पीएचडी पदवी प्रदानही केली गेली. या प्रकारानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. नील सोमय्या यांना इतक्या ‘एक्स्प्रेस’ वेगाने पीएचडी पदवी दिली कशी?, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, यावर मुंबई विद्यापीठाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले की, नील सोमय्या यांनी जून २०२१ मध्ये पीएचडीसाठी नोंदणी केली होती. त्यानंतर १७ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी प्रबंध सादर केला. हा संपूर्ण कालावधी १४ महिन्यांचा होता. नियमानुसार पीएचडीसाठी नोंदणी केल्यानंतर १२ महिन्यांनी संबंधित विद्यार्थ्याला आपला प्रबंध सादर करता येतो. त्यामुळे नील सोमय्या यांना योग्य पद्धतीने पदवी देण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.