नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (HM Amit Shah) यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या गाडीखाली एक दुचाकीस्वार जिवंत जळाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यातील विशेष बाब म्हणजे या व्यक्तीला बाहेर काढण्याऐवजी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस या व्यक्तीचा व्हिडिओ काढत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
इंग्रजी संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना बिहारमधील देवरिया या ठिकाणी घडली आहे. छपरा-सिवान महामार्गावर पोलिसांच्या बसने एका दुचाकीचालकाला धडक दिली. त्यामुळे या दुचाकीवरील तरुण उडून खाली पडले. यापैकी एक तरुण या बसच्या खाली जाऊन पडला. नेमकं त्याचवेळी बसच्या इंधनाची टाकी फुटली आणि मोठा स्फोट झाला. तेथे उपस्थित असलेले पोलिसही पळू लागले. या स्फोटात संबंधित तरुण जिवंत जळाला. मात्र, पोलिसांनी त्याला वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. याउलट त्यांच्याकडून व्हिडिओ काढण्यात आला.
दरम्यान, अनेकदा दुसऱ्यांच्या मदतीला धावून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनीच अशाप्रकारे काम केल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला जात आहे.