गांधीनगर | सध्या गुजरात निवडणुकीचे पडघम वाजले आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतःला प्रचारात झोकून दिलं आहे. त्यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्र्यांवर आणि दोन बड्या नेत्यांवर निवडणुकीमध्ये विशेष जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नेते गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेससाठी महत्वाची भूमिका पार पाडताना दिसून येणार आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुकूल वासनिक यांना पक्षाने पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. चव्हाण, वासनिक यांच्यासह मोहन प्रकाश, बीके हरिप्रसाद आणि केएच मुनियप्पा या वरिष्ठ नेत्यांकडेही पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. वासनिक यांना गुजरातच्या दक्षिण क्षेत्राचे तर चव्हाण यांना मध्य क्षेत्राचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
याशिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे गुजरातमध्ये काँग्रेससाठी स्टार कॅम्पेनर म्हणून काम करणार आहेत. याबाबतची घोषणा देखील करण्यात आली आहे. स्टार कॅम्पेनरच्या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, वढेरा अशा एकूण ४० नावांचा समावेश आहे. याच ४० जणांच्या यादीत महाराष्ट्रातून अशोक चव्हाण आणि शिवाजीराव मोघे यांचा समावेश आहे.
दरम्यान, गुजरातमधील विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर उर्वरित ९३ जागांसाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबरला हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकींचे निकाल लागणार आहेत.