मुंबई | ”काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये. ते जे काही करत आहेत, ते कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी केले तर ठीक आहे. पण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काय करत असतील तर त्यांच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल”, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला.
‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त राहुल गांधी देशातील विविध राज्यांत जाऊन भेटीगाठी घेत आहेत. त्यांचा हा दौरा महाराष्ट्रात आहे. पण याच महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबाबत विधान केले. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे.
त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना इशारा दिला आहे. ते म्हणाले, ”आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा पुरवली आहे. त्यांची यात्रा सुरक्षित राज्याबाहेर पाठवू. मात्र, महाराष्ट्रातील वातावरण त्यांनी बिघडवू नये. भाजपबद्दल लोकांच्या मनात सकारात्मक भावना आहे. राहुल गांधी यांच्यासारख्या लोकांवर कारवाई करण्याचा फायदा नसतो. अनेक केसेस त्यांच्यावर यापूर्वीही झाल्यात. ते जामिनावरच बाहेर आहेत”.
…अन्यथा देशात काँग्रेस विसर्जित होईल
‘राहुल गांधी यांनी काढलेली यात्रा ही भारत जोडो यात्रा नाहीतर मोदीविरोधी जोडो यात्रा आहे. कारण काँग्रेसला लक्षात आले की, भारताची जनता मोदींशी जोडलेली आहे. त्यामुळे अस्तित्व टिकवायचं असेल देशभरात मोदींच्या विरोधकांना जोडायला हवं. अन्यथा देशात काँग्रेस विसर्जित होईल. त्यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी निघाले आहेत’, असेही ते म्हणाले.