मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात दिवसेंदिवस विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीबाबतच्या विधानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. ”शिवसेनेचे नेते ते गेल्यावर एखादं काही वाक्य बोलतात, पण बाकी सत्तेसाठी त्यांच्याच सोबत आहेत. हे सावरकरांसाठी सत्ता कधीच सोडू शकत नाहीत”, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने विविध राज्यांचा दौरा करत आहेत. सध्या ते महाराष्ट्रात आहेत. त्यांनी या दौऱ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आक्षेप घेतला. तसेच महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे विधान संजय राऊत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निशाणा साधला.
ते म्हणाले, ”ते नुसतं बोलतात, दरवेळेस राहुल गांधी येऊन सावरकरांबद्दल वाटेल तसं बोलतात. शिवसेनेचे नेते ते गेल्यावर एखादं काही वाक्य बोलतात, पण बाकी सत्तेसाठी त्यांच्याच सोबत आहेत. हे सावरकरांसाठी सत्ता कधीच सोडू शकत नाहीत.”
काय म्हणाले संजय राऊत…
”राहुल गांधींनी मध्येच वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते. मी तुम्हाला सांगून ठेवतोय. कारण वीर सावरकर हे नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील”, असे संजय राऊत म्हणाले.