वाराणसी | उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. 34 प्रवाशांनी भरलेली बोट गंगा नदीत बुडाली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. त्यानंतर यातील सर्वांना पाण्याबाहेर काढण्यात आले. पण यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली जात आहे.
शनिवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास केदार घाटपासून 34 प्रवाशांना घेऊन बोट शीतला घाटजवळ आली होती. तेव्हा बोटचा काही भाग तुटला. त्यामुळे बोट नदीत डुबू लागली. हे पाहून नाविकने पाण्यात उडी मारली आणि घटनास्थळावरून पळ काढला. पाण्यात बुडालेल्या लोकांचा आवाज ऐकून एकच गोंधळ उडाला होता. या परिसरात उपस्थित असलेल्या पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता तातडीने पावले उचलली. त्यांनी एक-एक करून सर्वच्या सर्व प्रवाशांना पाण्याबाहेर काढले.
दरम्यान, यामध्ये एका दाम्पत्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यातील महिलेला कंबीरचौर विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एकाला बीएचयू रुग्णालयात हालवण्यात आले आहे. हे सर्व प्रवासी आंध्र प्रदेशातील असल्याचे म्हटले जात आहे.