भोपाळ | काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचे नेतृत्त्व काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी हे करत आहेत. त्यांच्या या भारत जोडो यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता एक परदेशी पर्यटक ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाला आहे. हाच चर्चेचा विषय बनला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्यप्रदेशात आहे. या राज्यातील प्रवासाचा तिसरा दिवस आहे. काँग्रेसच्या या भेटीत ग्रँट नावाचा अमेरिकन नागरिक सहभागी झाला आहे. हाच परदेशी नागरिक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यात्रेत सहभागी होण्याबाबत ग्रँट म्हणाला, ”माणसे जोडण्याचा विषय मला खूप आवडतो आणि राहुल गांधींच्या भेटीमुळे मी खूप प्रभावित झालो आहे. प्रेम म्हणजे जोडणे. राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. आम्ही त्याबद्दल आनंदी आहोत. ते भारताला एकसंध करण्याविषयी बोलत आहेत. मला हा प्रवास आणि इथे चालणे आवडते. मला आशा आहे की, ही यात्रा भारताला जोडण्याच्या उद्देशात यशस्वी होईल.”
दरम्यान, भारत जोडो यात्रेत आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटी, राजकारणी सहभागी झाले आहेत. त्यात आता अमेरिकन नागरिक असलेला ग्रँट सहभागी झाला आहे. ग्रँट हा तामिळनाडूतील एका विद्यापीठात इतिहास विषयात पीएचडी करत आहे.