बेळगाव | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नवरून वादंग निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई यांची बैठक झाली. या बैठकीला 24 तास होत नाही तोच आता बेळगावात अज्ञातांनी कर्नाटक सरकारची गाडी फोडली.
सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांत तेढ निर्माण झाला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी अमित शहा यांची मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बोम्मई यांनी भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही राज्यांत शांतता प्रस्थापित होईल, असे वाटत होते. मात्र, गुरुवारी दुपारी बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. काही अज्ञातांनी कर्नाटक सरकारची गाडी फोडली.
अधिवेशनाच्या कामासाठी ही गाडी आली होती. गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाच तरुण दगडफेक करून फरार झाले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणाला दुखापत झाली नाही.