जयपूर | केंद्रीय अर्थसंकल्प तसेच राज्याचा अर्थसंकल्प दरवर्षी सादर केला जातो. काहींना अर्थसंकल्पात सांगितलेल्या गोष्टी कळत नाही. त्या समजून घेण्यासाठी काहीजण तज्ज्ञांचा सल्ला देखील घेतात. अर्थसंकल्प हे महत्वाचे घोषणापत्र आहे म्हणूनच ते शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना समजावं ह्या हेतूने राजस्थान सरकारने एक अनोखं पाऊल उचललं आहे.
राजस्थान सरकारनं यासंदर्भात सरकारी आणि खासगी विद्यापीठांसाठी आदेश काढले आहेत ज्यामध्ये त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लाईव्ह दाखवावा. तसेच अर्थसंकल्प त्यांना समजावून सांगण्यासाठी तज्ज्ञांची सोय करावी. असा उल्लेख केला आहे. राजस्थानचा अर्थसंकल्प येत्या १० फेब्रुवारी विधीमंडळात सादर होणार आहे.
सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये अर्थसंकल्पाचं लाईव्ह प्रसारणाची व्यवस्था करावी. ऑडिटोरिअम, मिटिंग हॉल किंवा मोठ्या वर्गात हे लाईव्ह प्रसारण दाखवता येईल. कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, शिक्षक, प्राचार्य हे बजेट पाहू शकतील असे राजस्थान सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.