पुणे | ‘इंडिया’ आघाडीची महत्वाची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावेळी बोलताना त्यांनी मोदी आणि अदानी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. जागतिक पातळीवरील गार्डियन आणि फायनान्शिअल टाईम्स या दोन प्रमुख आर्थिक वृत्तपत्रांचा पाठपुरावा करत अदानी समुहावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. यामध्ये अदानी कुटुंबाच्या भागीदारांनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरलेल्या निधीमध्ये गैरप्रकार असल्याचे संगितले.
अदाणी यांनी तब्बल ८ हजार करोडच्या गुंतवणूकीवर आपल्या शेअरची किंमत वाढवली. राहुल गांधी यांच्या मते भारताच्या शेअर मार्केटमध्ये अनैसर्गिक हस्तक्षेप करून पैसे कमावले जात आहेत आणि या निधिचा वापर करून अदानी देशाच्या डिफेन्समध्ये, पायाभूत सुविधांमध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये गुंतवणूक करत आहेत. याप्रकरणात राहुल गांधी यांनी गौतम अदानींचे भाऊ विनोद अदानी, नासिर अली शबान अली आणि चीनी नागरीक चँग चुंग लींग यांचा समावेश असल्याचं संगितले.
बातम्यांचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, “अदाणी समूहाची सेबी चौकशी झाली होती पण अदानीला लवकरच क्लीन चिट देण्यात आली.” ते पुढे म्हणाले “काँग्रेस नेत्यांनी अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशी करण्याची मागणीही केली आहे.” सरकारवर तोफ डागताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या मुद्द्यावरच्या शांत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. तसेच या प्रकरणाची चौकशी का होत नाही, यावर आश्चर्य व्यक्त केले.