लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांचं मतदान पूर्ण झालंय. देशात आणखी तीन टप्प्यांतील मतदान बाकी आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये चार टप्प्यात लोकसभेच्या 379 जागांसाठी आतापर्यंत मतदान झाले आहे. आता पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी 8 राज्यांतील 49 जागांवर मतदान होणार आहे.आगामी पाचव्या टप्प्यांसाठी येत्या 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. याच अनुषंगाने देशभरात अनेक दिग्गज नेत्यांचं भविष्य दावणीला लागल्याचं पहायला मिळतंय. मतदानाच्या पाचव्या टप्प्यांत देशभरातून एकुण 695 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलीये.
मतदानाच्या पाचव्या टप्प्यात बिहारमधील 5, जम्मू-काश्मीरमधील 1, महाराष्ट्र आणि यूपीच्या प्रत्येकी 13 जागांवर मतदान होणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या 7, झारखंडच्या 3 आणि ओडिशाच्या 5 जागांवरही मतदान होणार आहे. आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात 66.1 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 66.7 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 65.7 टक्के आणि चौथ्या टप्प्यात 67.3 टक्के मतदान झालंय. मतांचा हा आकडा गेल्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत अर्वरित टप्प्यांमध्ये मतदानाचा आकडा वाढवण्याची जबाबदारीही राजकीय पक्षांवर असणार आहे.
पाचव्या टप्प्यांत कोणते दिग्गज रिंगणात?
पाचव्या टप्प्यात लखनौमधून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमेठीतून स्मृती इराणी, रायबरेलीमधून राहुल गांधी, मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम, मुंबई उत्तरमधून पीयूष गोयल, बिहारमधील सारणमधून रोहिणी आचार्य, बिहारमधील हाजीपूरमधून चिराग पासवान असे दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत.
पाचव्या टप्प्यांत महाराष्ट्रावर नजरा
पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान लोकांच्या नजरा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशकडे लागल्या आहेत. महाराष्ट्रातील 13 जागांवर होणारे मतदान राजकीय पक्षांचे भवितव्य ठरवणार आहे. खासकरून महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात यावेळी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याच कारणांतून महाराष्ट्रातील लढतींकडे सध्या देशाच्या नजरा लागल्या आहेत.