पुणे | प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांची निधन वार्ता समोर येत आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेबद्दल सविस्तर बोलायचं झालं तर – रवींद्र महाजनी यांना दम्याचा त्रास होता, गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ते आंबी गावातील फ्लॅटमध्ये एकटेच भाड्याने राहत होते. 14 जुलैच्या रात्री त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने सोसायटीतील लोकांना संशय आला. त्यानंतर दरवाजा उघडून आत गेल्यावर महाजनी यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं. त्यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
महाजनी यांच्या मृत्यूमुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एका चांगल्या नटाला गमावल्याचं दुःख होत असल्याच बोलल जात आहे. मराठी सिंनेकलाकारांपासून ते नेत्यापर्यंत सर्वांनी यावर शोक व्यक्त केला आहे.
यामध्ये सुबोध भावे यांनी रविंद्र महाजनींचा फोटो पोस्ट करुन लिहीलंय की.. मराठी चित्रपटातील माझं व्यावसायिक अभिनेता म्हणून पहिलं पाऊल रविंद्र महाजनी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या ” सत्तेसाठी काहीही ” या चित्रपटातून पडले. अतिशय रूबाबदार, विलक्षण देखणे, खऱ्या अर्थाने मराठी मधील हॅंडसम नायक, कायम हसतमुख अशीच तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेली आहे. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.
यानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही आपली हळहळ व्यक्ति केली. ते म्हणाले, “आमच्या पिढीतील एकमेव देखणा नट आम्ही गमावला. तो हिरो आणि मी सहाय्यक भूमिकेत असं आम्ही बऱ्याचदा एकत्र चित्रपटात काम केलं आहे. त्यात काही यशस्वी चित्रपटांचाही समावेश आहे. पण एक चांगला माणूस, चांगला मित्र गेल्याचं खूप वाईट वाटतंय. हसमुख चेहऱ्याचा आणि नेहमी हसत-खेळत वावरणारा तो नट होता. त्याच्यातील सर्वांत मोठा गुण म्हणजे प्रामाणिकपणा. प्रत्येक भूमिका तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्तम साकारायचा. त्याने जे काम केलं, ते मनापासून केलं. त्यामुळे त्या काळातला तो यशस्वी अभिनेता होता.”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली.
“आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.”
रविंद्र महाजनी यांचा मृत्यू जितका दुर्दैवी आहे तितकच त्यांचं आयुष्य हे नाट्यमयी असं आहे. टॅक्सी ते थेटर असा हा त्यांचा प्रवास जाणून घेण्यासारखा आहे.
रवींद्र महाजनी यांचा जन्म कर्नाटकातील बेळगावी झाला होता. त्यांचे वडील लोकसत्ताचे संपादक होते. रवींद्र महाजनी यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. ते शाळा आणि महाविद्यालयातही नाटक, एकांकीकेत काम करायचे. शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या मित्रांनी भविष्यात काय करणार हे ठरवून टाकलं होतं. यामध्ये रवींद्र महाजनी यांनी अभिनेता व्हायचं ठरवलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिनेमा क्षेत्रात नशीब अजमावण्यासाठी रवींद्र महाजनी यांनी प्रचंड प्रयत्न केला.
“पर ये जिंदगी उतनी आसान कहा”, रवींद्र महाजनी यांचे सगळे प्लॅन विस्कटले कारण होते त्यांच्या वडिलांचं निधन. त्यामुळे झालं असं की घरची संपूर्ण जबाबदारी महाजनी यांच्यावर येऊन पडली. त्यासाठी त्यांनी छोटीमोठी कामे करण्यास सुरुवात केली जसे की टॅक्सी चालवने. महाजनी यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केल्याने त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना टोमणे ऐकावे लागले. संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून सगळे त्यांच्यावर हसायचे.
हे सगळं सुरू असताना त्यांच्याकडे एक संधी चालून आली, कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकात महाजनी यांना काम मिळालं आणि त्यांची भूमिकाही गाजली. नंतर कालेलकरांनी त्यांच्यासाठी तो राजहंस एक हे नाटक लिहिलं. नंतर शांताराम बापूंनी हे नाटक पाहिलं आणि त्यांनी थेट महाजनी यांनी झुंज या सिनेमात काम दिलं. 1974 साली आलेला हा सिनेमा प्रचंड गाजला. तो इतका की रवींद्र महाजनी नवा स्टार म्हणून उदयास आले. झुंजने त्यांच्या नऊ वर्षाचा वनवासही संपवला.
त्यानंतर रवींद्र महाजनी यांच्याकडे सिनेमाच्या प्रचंड ऑफर आल्या. आराम हराम आहे, लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ, देवता, मुंबईचा फौजदार आदी सिनेमात त्यांनी काम केलं. अगदी अलिकडे म्हणजे 2015 मध्ये नंतर त्यांनी कॅरी ऑन मराठा, काय राव तुम्ही, देऊळबंद आणि पानीपत आदी सिनेमात काम केलं. रवींद्र महाजनी यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं आहे
पाहायचं झालं तर या इतक्या मोठ्या हस्तीचा हा असा मृत्यू होणे ही खेदाची बाब आहे पण रुपेरी पडद्यातील विश्वासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. आयुष्यभर अफाट प्रेम मिळालेल्या पण एकांती, निर्जन आणि कुठल्यातरी कानाकोपर्यात बिनबोभाट मृत्यू पावलेल्यांच्या यादीत महाजनी ही नकळत जाऊन बसले आहेत. जाणून घेऊ अशा काही व्यक्ती ज्यांचा एकलकोंडी मृत्यू झाला.
- बॉलिवूड गाजवलेल्या बोल्ड अभिनेत्री परवीन बाबी यांचा मृतदेह तीन दिवस त्यांच्या बंद खोलीत होता. अखेर दिग्दर्शक महेश भट्ट यांना परवीन बाबी यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले.
- ‘द डर्टी’ सिनेमात अभिनेता विद्या बालन हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिच्यासोबत देखील असंच काही झालं होतं. वयाच्या ३३ व्या वर्षी आर्या हिचा मृतदेह तिच्या राहत्याघरी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तिच्या मृत्युची बातमी 2 दिवसानी समजली
- अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका करणारे महेश आनंद यांचं २०१९ मध्ये निधन झालं. निधनाच्या दोन दिवसांनंतर अभिनेत्याचा मृतदेह त्यांच्या बंद खोलीत आढळला.
- अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासोबत रज्जो सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृतिका चौधरी हिचा मृतदेह देखील मुंबईतील तिच्या राहत्या घरी आढळला. निधनाच्या चार दिवसांनंतर अभिनेत्रीच्या मृत्युची माहिती समोर आली