आयुष्यभर काबाड कष्ट करून, जीवाचं रान करून आी वडील आपल्या मुलांना शिक्षण देत असतात. मात्र, हीच मुलं मोठी झाल्यानंतर, नोकरीला लागल्यानंतर आणि लग्नानंतर आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात ही आजच्या जगातली विदारक परिस्थिती आहे. वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची आई-वडिलांची इच्छा असते. मात्र आई-वडिलांची एवढीही अपेक्षा मुलं पूर्ण करू शकत नाहीत, तेव्हा आई-वडिलांनी कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी? असा सवाल करत दिग्दर्शक महेश मांजरेकर नवा मराठी सिनेमा घेून प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. 26 एप्रिल रोजी महेश मांजरेकरांचा जुनं फर्निचर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अडगळीत पडलेल्या नात्यांना वाचा फोडणारा हा सिनेमा आहे असं दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी चित्रपटाचं वर्णन करताना सांगितलंय. या सिनेमात स्वतः महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
यतिन जाधव निर्मित, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा सिनेमा २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही महेश मांजरेकर यांनीच लिहीले आहेत. स्वतःच्या आयुष्यातील एका सत्य परिस्थितीवरून आपल्याला या सिनेमाची कथा सुचली असल्याचं महेश मांजरेकरांनी सांगितलंय. विशेष म्हणजे महेस मांजरेकरांनी हा सिनेमा त्यांच्या दिवंगत आईला समर्पित केला आहे. महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे हे वेगळेपण ‘जुनं फर्निचर’मध्येही जाणवत आहे. ‘या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !’, या टॅगलाईनवरून हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा असल्याचे दिसून येत आहे.
सिनेमाच्या ट्रेलरमधील महेश मांजरेकर यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवतो. मुळात हा आपल्या आजुबाजुला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्क व्यक्ती म्हणजे ‘ओल्ड फर्निचर’ वाटतात. परंतु याच जुन्या फर्निचरचे महत्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मल्टीस्टारर असलेला हा एका कौटुंबिक सिनेमा आहे.
सिनेमाबाबत बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले की, ‘हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यापैकीच हा ‘ओल्ड फर्निचर’ म्हणजेच ‘जुनं फर्निचर’. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली ‘जुनं फर्निचर’ म्हणतात. परंतु हेच जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. यात भावना दडलेल्या आहेत. चित्रपटगृहातून बाहेर पडताना ‘जुनं फर्निचर’बद्दलचा दृष्टिकोन बदलावणारा हा चित्रपट आहे.’ महेश मांजरेकरांनी बोलून दाखवलेल्या विश्वासाप्रमाणेच हा सिनेमा प्रेक्षकांचा वृद्धांकडे आणि प्रामुख्यानं आपल्या आई-वडिलांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलेल अशी आशा सगळीकडून व्यक्त केली जातेय.