पुणे | गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसून येतोय. त्यामुळे नागरिकांना कधी उन्हाची झळ तर कधी थंडीचा तडाखा सहन करावा लागत आहे. फेब्रुवारीमध्ये १४७ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी चांगलीच दमछाक होत आहे. या बदलत्या तापमानाचा परिणाम पुणेकरांमध्ये दिसून येत आहे. अनेक नागरिकांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. त्यात उन्हाचं प्रमाणही चांगलंच वाढलं आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत शहराचे तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. देशाच्या उत्तरेकडील भागातून उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असताना, वाऱ्याची दिशा बदलल्याने तापमानात अचानक वाढ झाली आहे.
त्याचबरोबर, IMD अधिकार्यांनी लोकांना उष्माघात आणि इतर उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. वृद्ध आणि मुले विशेषतः उष्णतेशी संबंधित आजारांना बळी पडतात
काय खबरदारी घ्याल?
सर्वात उष्ण भागात बाहेर जाणे टाळावे.
भरपूर पाणी प्यावे.
शक्यतो थंड, सावलीच्या ठिकाणी राहावे.
शेतकर्यांनी उष्णतेच्या काळात शेतात काम करणे टाळावे
जनावरांना पुरेसे पाणी आणि सावली मिळेल याची खात्री करावी.
अचानक झालेल्या या तापमानाचा फटका केवळ पुणेकरांनाच नाही तर, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये बसणार आहे. या उष्णतेच्या लाटेत आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या टाळण्यासाठी लोकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. IMD ने लोकांना हवामानाच्या परिस्थितीबद्दल माहिती ठेवण्याचा आणि सुरक्षित राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. या सगळ्यांच नीट निरीक्षण करा आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.