मुंबई | रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि एम.डी असलेले मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी यांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्यालयातील एका फोनवर हि धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना हि माहिती मिळताच या प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू केला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे.
आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रिलायन्सच्या कार्यालयातील लॅंडलाईनवर एक अज्ञात नंबरवरुन कॉल आला होता. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये बॉंबस्फोट करण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनाही जीवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली. या प्रकरणाची दखल डीबी मार्ग पोलिसांनी घेतली असून त्यांचा तपास सुरू आहे.
याआधी ऑगस्ट महिन्यात देखील रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा एक फोन कॉल आला होता. याची तक्रार डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला होता. त्यानंतर बिष्णू विदू भौमिक (वय 56) या आरोपीला अटक करण्यात आले होती. त्या आरोपीचे दक्षिण मुंबईत ज्वेलरीचे दुकान आहे.