मुंबई | शिवसेनेची नाळ शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याशी घट्ट जोडलेली आहे. शिवसेनेत शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेचे पहिल्यांदाच दोन वेगवेगळे दसरा मेळावा होत आहेत. बहुप्रतिक्षित दसरा मेळाव्यावरून, शिवाजी पार्कच्या संमतीवरून अनेक वाद विवाद होताना सर्वांनी पाहिले. शिवसेनेच्या राजकारणात इतका महत्त्वाचा समजला जाणारा आणि शिवसेनेची प्रतिष्ठा असणारा या दसरा मेळाव्याला प्रांरभ कधी झाला? या परंपरेची सुरूवात कशी झाली? पहिल्या शिवसेनेचा दसरा मेळावा कसा आणि कुठे झाला ?
बाळासाहेबांनी सुरू केलेला दसरा मेळावा शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी एखाद्या औषधाच्या मात्रे प्रमाणे ठरू लागला. दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांची तोफ गडगडतं असे. बाळासाहेबांचे समुद्ध विचार, शिवसेनेची पुढची राजनीति हे सर्व तरूणांना व शिवसैनिकांना ऐकायला मिळतं. दसऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे विचारांचं सोनं लुटत असे व विचारांची पुंजी घेऊन शिवसैनिक पुढील वाटचालीसाठी मार्गस्थ होई.

शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी व पक्ष संघटित करण्यासाठी दसरा मेळावा हा रामबाण उपाय ठरला. कारण दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनसमुदाय एकत्रित येत असे. अनेक नवे शिवसैनिक दसरा मेळाव्यापासून प्रेरित होऊन शिवसेनेत सहभागी होत. व आधीच्या जुन्या शिवसैनिकांना नवी उर्जा, प्रेरणा, नवे विचार दसरा मेळाव्यातून मिळतं असे. शिवेसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची परंपरा बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी यशस्वीरीत्या पुढे चालवली. आता मात्र शिंदे आणि ठाकरे यांचे दोन वेगळेवेगळे मेळावे शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणून पार पडणार आहेत.
शिवसेनेची स्थापना १९६६ साली जून महिन्यात झाली तेव्हा शिवसेना हा कोणता राजकीय पक्ष नसून मराठी माणसांच्या हक्कासाठी, न्यायासाठी सुरू झालेली ती एक संघटना होती. पुढे लोकसमुदायाच्या उदंड प्रतिसादामुळे संघटनेला राजकीय पक्षाचे स्वरूप आले. बाळासाहेबांच्या मनात शिवसेनेचा पहिला भव्य मेळावा घेण्याचा विचार पक्का झाला. त्यासाठी २३ ऑक्टोबर १९६६ रोजी दसरा सणाचा मुहुर्त देखील ठरला. जागा न् वेळ नक्की झाली. शिवसेनेच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ही जागा निश्चित झाली. या मेळाव्याच्या तयारीमध्ये स्वतः बाळासाहेबांनी जातीने लक्ष दिले. एवढेचं काय बॅनर च्या डिझाईनसाठी ते भायखळ्याच्या ईराणी चाळीतील भाई गुजर यांच्याकडे गेले होते. सभेची तयारी जोरदार झाली. बाळासाहेबांच्या मार्मिक साप्ताहिकांमधून जाहीरात देखील करण्यात आली. जय्यत तयारीनंतरही शिवसेनेचा हा पहिला मेळावा रद्द झाला. दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर दुसरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा रद्द झाला. सभा रद्द झाल्याच्या बातमीमुळे शिवसेनेत नाराजी पसरली.

मात्र शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांची नाराजी दुर करत पुढील आठवड्यात रविवारी ३० ऑक्टोबर रोजी सभा असल्याचं साप्ताहिक मार्मिक मधून जाहीर केलं. शिवसेनेत नवचैतन्य पसरलं. शिवसैनिक पुन्हा तयारीला लागले. एकदा रद्द झालेल्या सभेला पुन्हा लोक प्रतिसाद देतात का नाही अशी धाकधूक होतीच. मात्र बाळासाहेबांची किमया व लोकप्रियता तेव्हाही दिसून आली. शिवसेनेच्या पहिल्या सभेला जनसमुदाय लोटला होता. संपुर्ण शिवाजी पार्क लोकमय झालं होत. पहिल्याच सभेत बाळासाहेबांनी लोकांची मने जिंकली. बाळासाहेबांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील भर सभेत ‘बाळ महाराष्ट्राला अर्पण करतं असल्याचं जाहीर केलं. पुढे शिवसेनेची घौडदौड आजतगयात सुरू आहे. १९६७ पासून दरवर्षी दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतं आला आहे.