रत्नागिरी | राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांना राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. अनिल परब यांचं दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्यात येणार आहे. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली आहे. तसेच तीन महिन्यात हे रिसॉर्ट पाडण्याचा कालावधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परब यांचं हे रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
रत्नागिरीच्या दापोली येथे अनिल परब यांचं हे साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट आपलं नसल्याचं अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केलं असलं तरी हे रिसॉर्ट परब यांचंच असल्याचा दावा सोमय्या यांनी केलेला आहे.
दरम्यान, चिपळूणच्या बांधकाम विभागाकडून आज स्थानिक वर्तमानपत्र दैनिक तरुण भारतमध्ये टेंडर जाहिरात देण्यात आली आहे. साई रिसॉर्ट पाडण्यासाठीची ही जाहिरात असून कंत्राटदारांना 10 नोव्हेंबरपर्यंत टेंडर भरण्याचं आवाहन या जाहिरातीतून करण्यात आलं आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट एनएक्सचे बांधकाम, पोचरस्ता, कंपाऊड वॉल, इमारतीच्या भिंती पायापर्यंत पाडायच्या आहेत. तसेच रिसॉर्ट पाडल्यानंतर उरलेला सिमेंट आणि मातीचा ढिगारा उचलून त्याची विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर रिसॉर्ट पाडलेल्या जागेचं सपाटीकरण करायचं आहे, असं या टेंडरमध्ये कामाचं स्वरुप देण्यात आलेलं आहे.