पुणे | शनिवारी (दि.२२) रोजी सकाळी 10.52 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत 6 वर्षीय मुलगी गंभीररित्या भाजल्या गेली. या मुलीचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
इकरा नईम खान ( वय 6 ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सदाशिव पेठेतील स्काऊट ग्राउंड जवळील हैदराबादी बिर्याणी हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये शनिवारी सकाळी 10.40 वाजता आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर हॉटेलमधील कामगारांनी अग्निशामक दलास याबाबत माहिती दिली.
10.52 मिनिटांनी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी हॉटेलच्या पोटमाळ्यावर कामगाराची मुलगी झोपली असल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यामुळे जवानांनी तत्काळ मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, गंभीर जखमी झालेल्या मुलीला जवानांनी बाहेर काढले, त्यानंतर देवदूत वाहनातून तिला तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र मुलगी गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अग्निशामक दलाच्या जवानांनी हॉटेलमधील 3 सिलेंडर बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळविले.