पुणे | कोंढवा येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी या इमारतीच्या वरच्या भागातून आधी धुर निघाल्याचं प्रत्यक्षदर्शींना दिसले. त्यानंतर याच ठिकाणाहून मोठ मोठे आगीचे लोट बाहेर पडताना दिसले.
कोंढवा येथील लुल्लानगर चौक मार्वल विस्टा बिल्डिंग(पीएनजी ब्रदर्स) येथे आगीची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडची वाहनंदेखील पोहोचली आहे. 2 टँकरदेखील आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
हॉटेलच्या इमारतीत सातव्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत हॉटेलचं मोठं नुकसान झाले आहे. मात्र घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हंटल जात आहे. अद्याप अधिकृत माहिती प्रशासनातर्फे देण्यात आलेली नाही.
दरम्यान आग लागताच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत.