पुणे | नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर अखेर आता या परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचा प्रशासनाने बडगा उगारला. तब्बल १०० पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली.
कात्रज नवीन बोगदा ते नवले पुल या परिसरात रात्रीच्या सुमारास झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात १० जण गंभीर जखमी झाले, तर एका तरुणाचा मृत्यू झाला. याबरोबरच सुमारे ३२ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
त्यानुसार, पोलिस, महापालिका, रस्ते विकास महामंडळ यांच्या पथकाने घटना स्थळाची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचविल्या होत्या. तसेच सातत्याने होणाऱ्या अपघाताबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले होते.
दरम्यान, मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नवले पुल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. महापालिकेचे शेकडो कर्मचारी यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिका अतिक्रमण विभाग पोलिस बंदोबस्त तसेच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे सुमारे १०० हून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर होते.