पुणे | पुण्यातील मनसेची धडाडीची तोफ म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी शुक्रवारी (दि.9) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर खुद्द वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला असून, मी मनसेतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वसंत मोरे मनसेत नाराज असल्याचे गेल्या काही दिवसांपासून म्हटले जात होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, वसंत मोरे यांची अमित ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर नाराजी दूर झाल्याचे म्हटले जात आहे.
या भेटीची माहिती देताना वसंत मोरे म्हणाले, ”मला काल रात्री अमित साहेबांचा भेटायला या असा फोन आला होता. आमच्या दोघांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाली. तुमची बाजू जाणून घेण्यासाठी भेटायला बोलावलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मी माझ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. आमच्या भेटीनंतर कोअर कमिटीलाही त्यांनी भेटीला बोलावलं आहे”.
मला जायचं असतं तर कधीच गेलो असतो
मी आखलेल्या रणनीतिला कुठे तरी छेद दिला जात आहे. हे मी त्यांना दाखवले. मी माझी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवर क्लिप टाकली होती. त्यानंतर मी स्पष्ट केलं होतं. मला जायचं असतं तर कधीच गेलो असतो. मी पक्ष सोडणार असं सांगितलेलं नाही. इतर पक्षातील लोक मला घेण्यासाठी इच्छुक आहे. त्यात मी काही करु शकत नाही. वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, असेही त्यांनी सांगितले.