नवी दिल्ली | ”मला जेव्हा सुट्टी हवी असते तेव्हा मी संसदीय मंडळासोबत चर्चा करतो. सुट्टीवर असताना काही काम करता येईल का, पक्षासाठी काही करता येईल का, याकडेही लक्ष देतो”, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले.
राजकीय नेतेमंडळी सार्वजनिक जीवन जगत असताना त्यांना काही मर्यादा येतात. पूर्णवेळ जनतेची सेवा करत असताना वैयक्तिक जीवनात त्यांना फार काही वेळ देता येत नाही. असाच अनुभव जे. पी. नड्डा यांचाही आहे. त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांच्या खासगी जीवनाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, ‘जेव्हा मला कधी सुट्टी हवी असते तेव्हा मी संसदीय मंडळासोबत चर्चा करतो. जेव्हा सुट्टीवर जातो तेव्हा काय काम करू शकतो का, याचाही विचार करत असतो. मी जिथं कुठं जातो तेव्हा पक्षासाठी काय करता येईल, याचाच विचार करतो. मी माझ्या कुटुंबियांनाही क्वालिटी टाईम देतो’.
तसेच आम्हाला आमच्या कामात तेव्हाच आनंद मिळतो जेव्हा सर्वकाही ठीक असते. घर ठीक असते. घरातल्या लोकांनाही माहिती आहे की मी केव्हा भेटेन, केव्हा वेळ देईन कारण वैयक्तिक जीवनात तुम्ही दुर्लक्ष करून चालत नाही. कारण हे आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण भाग आहे, असेही ते सांगायला विसरले नाहीत.