नवी दिल्ली : ”महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) मध्यस्थी करणार आहेत. महाविकास आघाडीच्या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांची अमित शहांकडे तक्रार केली. याची गंभीर दखल शहांनी आहे”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तापत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून विधाने केली जात आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील नेतेमंडळींकडून त्याला वेळोवेळी प्रत्युत्तर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात दगडफेक करण्यात आली. आता हा प्रश्न टोकाला जात असताना महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शहांकडे तक्रार केली आहे.
याबाबत माहिती देताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ”महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत. महाविकास आघाडीच्या खासदारांनी बसवराज बोम्मई यांची अमित शहांकडे तक्रार केली. याची गंभीर दखल शहांनी घेतली आहे. 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बोम्मई यांच्यासोबत अमित शहा एकत्र चर्चा करणार आहेत”.