पुणे | सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सतर्फे ‘रोजगाराचे भविष्य : आव्हाने आणि संधी’ (Future of Employment : Challenges and Opportunities – FECO 2023) या विषयावरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन १८ व १९ जानेवारी रोजी सिंबायोसिस विश्वभवन, सेनापती बापट रस्ता येथे करण्यात आल्याची माहिती सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संचालिका डॉ. ज्योती चंदीरमाणी यांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. नीती आयोग, मानव विकास संस्था (IHD) यांच्या सहकार्याने FECO 2023 चे आयोजन सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) तर्फे करण्यात आले आहे. २०१९ मध्ये आयोजित केलेल्या मागील परिषदेच्या यशावर आधारित ‘FECO २०२३’, ही रोजगार व त्यातील आव्हाने या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद आहे. जी जगभरातील संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची संधी देते.
या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे, लिंगावर आधारित वेतनाची असमानता कमी करणे, कामगारांसाठी कामाची परिस्थिती सुधारणे आणि विकसनशील आणि उदयोन्मुख राष्ट्रांमध्ये एक मजबूत कल्याणकारी व्यवस्था निर्माण करणे हा या आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
या परिषदेचे उद्घाटन आणि समापन सत्रांव्यतिरिक्त, इतर पाच सत्रांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्रात ‘आयएलओ’चे उपसंचालक सातोशी सासाकी, ‘जेएनयू’चे सेवानिवृत्त प्रा. संतोष मेहरोत्रा आणि अभ्यागत प्राध्यापक – बाथ विद्यापीठ तसेच मानव विकास संस्थेचे संचालक प्रा. अलख शर्मा आदी वक्त्यांचा समावेश असणार आहे. ते जागतिक स्तरावरील तसेच भारतातील रोजगाराच्या स्थितीवर बोलतील आणि शाश्वत विकास लक्ष्य ८ पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या संधींविषयी मार्गदर्शन करतील.
मान्यवर वक्त्यांव्यतिरिक्त सदर परिषदेसाठी संशोधक, पीएचडी विद्यार्थी , अभ्यासक देखील उपस्थित राहणार आहेत. परिषदेबद्दलची अधिक माहिती https://www.sse.ac.in/feco2023 येथे उपलब्ध आहे.