मुंबई | राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (Eknath Shinde) हे वेगळे झाल्यापासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. असे असताना आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) चौकशी करण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाला हा एक धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेना नेत्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटाने ठाकरे गटातील अनेक आमदार, खासदार आपल्याकडे घेत राजकीय खेळी केली आहे. तसेच ठाकरे गटातील अनेक नेत्यांना भाजपच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. आता वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यावर नाईक यांनी भाजपला धारेवर धरले आहे. ते म्हणाले, ‘या चौकशीमागे निश्चितपणे भाजपचे काही नेते असतील, असा मला विश्वास आहे. अशाप्रकारे दबाव आणून आम्हाला भाजपमध्ये आणता येईल का? असा जर प्रयत्न होत असेल तर त्याला माझा कायमच विरोध राहील. त्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही.’
दरम्यान, एसबीकडे कोणीतरी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारावर मला शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं एक समन्स मिळालं होतं. प्राथमिक चौकशी देखील माझ्याकडे केली गेली. त्यांना जी माहिती हवी आहे ती सर्व माहिती मी त्यांनी सांगितलेल्या मुदतीच्या आतच देण्याच निश्चितपणे प्रयत्न करेन आणि त्यांना योग्य माहिती देईन, असे म्हटले आहे.