पुणे | पिंपरीतील भाजपच्या माजी नगरसेवकावर 15 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल (FIR on Rajesh Pille) करण्यात आला आहे. या माजी नगरसेवकाने जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारात कंपनीच्या वतीने व्यवहार करताना कंपनीला पूर्वकल्पना न देता जमिनीची परस्पर विक्री करुन फसवणूक केली. याप्रकरणी रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले ऊर्फ राजेश पिल्ले (वय ५२, रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा (Pimpri Crime) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय दयानंद ओसरमल यांनी फिर्याद दिली. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
रामकुमार अगरवाल यांची ब्रम्हाकॉर्प लिमिटेड ही कंपनी आहे. अगरवाल हे त्या कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी पिल्ले यांना विश्वस्त प्रतिनिधी म्हणून नेमले होते. त्यानंतर पिल्ले यांनी अगरवाल यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर धनंजर हनंमत लांडगे आणि संतोष सोपानराव लांडगे (रा. पिंपरी) यांना खरेदी खताने विक्री केली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ब्रम्हाकॉर्प कंपनीचा विश्वासघात केल्याने 15 कोटींचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिल्ले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, भाजपचे माजी नगरसेवक आणि विद्यमान पदाधिकाऱ्याने हा प्रकार केल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, लवकरच पुढील कारवाई केली जाईल.