मुंबई | शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव यावर शिंदे गटाने दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेले आहे. त्यावर आयोगाने हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. त्यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी तुरुंगातून भाष्य केले आहे. ‘शिवसेनेचे नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल. आम्हीही मोठे होऊ, असे संजय राऊत म्हणाले.
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत आहे. त्यामुळे ते सध्या सक्रिय राजकारणात दिसत नाहीत. मात्र, ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून राजकीय घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. शिवसेना हे नाव ठाकरे गटाला मिळणार की नाही, या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ‘शिवसेनेचे नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल. आधी ज्या पक्षांची चिन्हं गोठवली गेली ते पक्ष मोठे झाले आहेत. आम्हीही मोठे होऊ’, असे ते म्हणाले.
दरम्यान, तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम आणखी 7 दिवसांनी वाढवण्यात आला आहे.