मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा राजीनामा उद्या अकरा वाजेपर्यंत स्वीकारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्वच्या निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके याच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांना पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच महापालिका प्रशासनाकडे दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्याबाबत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून दिरंगाई केली जात होती. याच निर्णयाविरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने ठाकरे गटाची मागणी मान्य करत लटकेंचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास ठाकरे गटाकडून ‘प्लॅन बी’ तयार करण्यात आला होता. त्यानुसार, डमी उमेदवारही दिला जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता हायकोर्टानेच राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिल्याने ऋतुजा लटके यांच्यासह ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.