पुणे | भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात बारामती अॅग्रो साखर कारखान्याच्या गाळप हंगामावरून टीका टिप्पणी सुरु आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनी राम शिंदे यांना ट्विटरवर प्रत्युत्तर दिले आहे. ‘राम शिंदे साहेब, पु्ड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिंमत असेल, तर याचा पुरावा द्या’, असे ते म्हणाले.
राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करताना ‘माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना दहा फोन केले’, असे म्हटले होते. त्याचाच समाचार रोहित पवार यांनी घेतला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘राम शिंदे साहेब, पु्ड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिंमत असेल, तर याचा पुरावा द्या आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा. मग मैदानात बघू’, असे खुले आव्हानही दिले आहे. तसेच ज्याला पैसा आणि अहंकाराची ‘खाज’ आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहीत नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू?, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, रोहित पवार हे राम शिंदे यांच्या वक्तव्यानंतर चांगलेच संतापले असून, त्यांनी तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा. मग मैदानात बघू, असे आव्हानच दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय आखाडा रंगणार अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे.